१) बोगस मतदानाविरोधात सत्याचा मोर्चा; राज ठाकरेंनी दिला मनसे स्टाईल इशारा मुंबई : आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने बोगस मतदानाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली तसेच त्यांनी दुबार आणि तिबार मतदार मतदान केंद्रावर आढळल्यास त्यांना फोडून काढा, असा थेट इशाराच यावेळी दिला. या मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली. यासभेत बोलताना राज ठाकरेंनी हा इशारा दिला. ===================== २) पुण्यात गणेश काळेवर सहा राऊंड फायर अन् कोयत्याने वार, जागीच मृत्यू पुणे : पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे सावट निर्माण झाले आहे. कोंढवा परिसरात झालेल्या भयंकर हल्ल्यात गणेश काळे (वय अंदाजे ३५) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, मृत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ असून, समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सक्रिय सदस्य आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, समीर काळे यानेच वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. सध्या समीर काळे कारागृहात असून, त्याचा भाऊ गणेश याची आज हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये परस्पर संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे. ===================== ३) कुस्तीविश्वात खळबळ.. ! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक Sikandar Shaikh Arrested : कोल्हापूरातील गंगावेश तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख (वय २६) याला पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकाने शस्त्रतस्करी प्रकरणी अटक केली आहे. पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारी साखळीचा भंडाफोड करत पोलिसांनी चार जणांना पकडले, ज्यात सिकंदरचा समावेश आहे. या कारवाईत पाच पिस्तुले, काडतुसे, सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. ===================== ४) ‘लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल’; शरद पवार मतदार याद्यांतील घोळ बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसे पक्षातील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. भाषणेवेळी त्यांनी ‘मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल’, असं म्हणाले. ‘सातत्याने सत्तेचा गैरवापर केला जातोय. या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, पण या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीचा अधिकार जतन करावं लागेल’, असं शरद पवार म्हणाले. ‘माझ्यासकट माझ्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न’ : उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “अर्जदारांनी पुन्हा एकदा आपली नावं तपासावीत.” अर्ज व्हेरिफिकेशनसाठी एका व्यक्तीचा अर्ज आला होता. मी तो अर्ज वाचला असता, अर्जाच्या शेवटी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव लिहिलं होतं,” असं ठाकरे म्हणाले. याचदरम्यान त्यांनी पुढे सांगितलं की, हा प्रकार ‘सक्षम’ नावाच्या अॅपवरून करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मतदार यादी हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय आहे. माझ्यासकट माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला गेला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, असा संशयही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ===================== ५) फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन फलटण : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयपीस अधिकारींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचे तापले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. ===================== ६) देशात नोव्हेंबरमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता IMD weather update: यंदा मॉन्सूनच्या परतीच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांना जोरदार पावसाचा तडाखा बसला. तरीदेखील राज्यात ऑक्टोबर महिन्यातील सरासरीएवढाच पाऊस झाला आहे. १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात ७७.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीपेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी अधिक आहे. कोकणात सरासरीपेक्षा अधिक, तर राज्यातील इतर भागांत सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीचा ‘ऑक्टोबर हीट’ मात्र नागरिकांसाठी चांगलाच त्रासदायक ठरला. ===================== ७) वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू Venkateswara Swamy Temple Stampede | आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील ऐतिहासिक श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकादशीनिमित्त भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहेत. एकादशीमुळे पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आत प्रवेश मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली, ज्यामुळे अचानक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक भाविक खाली कोसळले आणि गर्दीच्या रेट्यात चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ===================== ८) पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्तीसगडच्या नवीन विधानसभेचे उद्घाटन रायपूर : आज, छत्तीसगड त्यांच्या 25 वर्षांच्या प्रवासात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचत असताना, ही नवीन विधानसभा राज्यातील जनतेला समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. छत्तीसगडच्या जनतेचे आणि राज्य सरकारचे अभिनंदन. छत्तीसगडच्या दृष्टिकोनातून, ते बांधण्याचा संकल्प आणि नंतर त्या संकल्पाच्या पूर्ततेतून ते प्रत्येक क्षणी छत्तीसगडच्या परिवर्तनाचे साक्षीदार राहिले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी शनिवारी रायपूरमध्ये छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. ===================== ९) रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती जाहीर भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी अखेर आपल्या २० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या गौरवशाली कारकिर्दीला पूर्णविराम देत निवृत्तीची घोषणा केली आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली. बोपण्णा यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते थोडे निराश झाले असले तरी, त्यांच्या योगदानाचा सन्मान करत आहेत. ===================== १०) जुबिन गर्ग यांच्या अखेरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला विक्रमी गाजावाजा गायक जुबिन गर्ग यांच्या अखेरच्या आसामी चित्रपट ‘रोई रोई बिनाले’ ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत नवा इतिहास रचला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रोई रोई बिनाले’ या चित्रपटासाठी आसाममधील चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसून आली. अनेक चाहत्यांनी जुबिन गर्ग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा चित्रपट पाहिला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकत उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसाची कमाई जील क्रिएशन्स आणि आय-क्रिएशन यांच्या बॅनरखाली निर्मित या आसामी संगीतमय रोमँटिक ड्रामा चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल १.५३ कोटी रुपये कमावले. आसामी सिनेमासाठी ही कमाई ऐतिहासिक मानली जात आहे.