Pimpri : रोजच वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

भोसरी : भोसरीतून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर जय गणेश चौक परिसर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि अरुंद रस्त्यामुळे येथे दररोज सकाळी व सायंकाळी किमान एक ते दोन तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या इतकी तीव्र झाली आहे की, सामान्य प्रवाशांबरोबरच रुग्णवाहिका, शालेय वाहने, व्यापारी वाहतूक आणि नागरिक सर्वच या कोंडीत अडकून बसतात.
जय गणेश चौकातील ट्रॅफिक कोंडी ही केवळ एक वाहतूक समस्या नाही, तर ती नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर, आरोग्यावर आणि अर्थकारणावर परिणाम करणारी गंभीर बाब आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व सिग्नल यंत्रणांचे आधुनिकीकरण आता विलंब न करता तात्काळ करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी, हीच नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
सिग्नल बंद पडल्याने समस्या वाढते
जय गणेश चौकात लावलेला सिग्नल अनेक वेळा बंद पडतो किंवा व्यवस्थित कार्य करत नाही. परिणामी, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा काम करत नाही. काही वेळा पोलीस कर्मचारी येथे तैनात असले तरी वाहनांच्या संख्येमुळे ते देखील नियंत्रण ठेवू शकत नाहीत. सिग्नल बंद पडल्यामुळे गोंधळ वाढतो आणि अनेक चालक नियम मोडून वाहनं चालवतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा अडकल्याचे प्रकार
या रस्त्यावरून पुण्यातील ससून रुग्णालय किंवा इतर रुग्णालयात जाणाऱ्या अनेक रुग्णवाहिका दररोज या वाहतूक कोंडीत अडकतात. वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे त्यांना पुढे सरकण्यासाठी मार्ग मिळत नाही. काही वेळा गंभीर रुग्ण असतानाही रुग्णवाहिका 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कोंडीत अडकून राहते. अशा घटनांमुळे अनेकदा रुग्णाचा जीव धोक्यात येतो.
रस्त्याचे रुंदीकरण रखडलेलेच
जय गणेश चौक हा पुणे-नाशिक मार्गावरील एक महत्त्वाचा जंक्शन आहे. दोन्ही बाजूंनी औद्योगिक वसाहती आहेत. रस्त्यावरून दररोज हजारो मालवाहू ट्रक, टेम्पो आणि शालेय बस यांची वर्दळ असते. या रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, हे प्रशासनालाही ठाऊक आहे. मात्र, अद्यापही ना भूमापन झाले, ना निधी वितरित झाला, ना काम सुरू झाले.
स्थानिक प्रशासनाकडून मौन
या संदर्भात महापालिका, पीडब्ल्यूडी आणि वाहतूक विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी अनेक वेळा ऑनलाइन तक्रारी, निवेदने व आंदोलने केली, तरीदेखील अद्याप ठोस निर्णय झाला नाही. एकंदर प्रशासनाची उदासीनता आणि नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही ऐकत आलोय की रस्ता रुंद केला जाणार, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. दररोज सकाळी ऑफिसला जाताना आणि संध्याकाळी परतताना अर्धा तास तरी कोंडीत अडकतो.
– प्रशांत जाधव, स्थानिक रहिवासी
अत्याधुनिक यंत्रणा बसवावी
या चौकात वाहतूक पोलिसांनी कुमक वाढवून वाहतूक नियंत्रित करता येईल. तसेच सिग्नल सतत कार्यरत ठेवण्यासाठी वेळेवर देखभाल आवश्यक आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प तत्काळ हाती घेणे गरजेचे आहे. सध्या पुण्यामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिस्टीम म्हणजे एआयचा वापर केला जात आहे. यामुळे ट्रॅफिक कॅमेरे, एलईडी सिग्नल आणि स्मार्ट ट्रॅफिक यंत्रणा वापरण्यात येत आहे. त्या धर्तीवर जय गणेश साम्राज्य चौकातही या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर होणे गरजेचे आहे.





