डॉ. सिमरन थोरात “पुण्याची स्वामिनी’, तर रश्मी माळवदकर “पुण्याची मानिनी’
पुणे – पारंपारिक वेशभूषेसह “इंडो वेस्टर्न लूक’मध्ये आत्मविश्वासाने वावरणाऱ्या स्पर्धक.. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. स्पर्धकांनी पिंग्यावर धरलेला ठेका.. अशा उत्साही वातावरणात “पुण्याची महाराणी’ या सौंदर्य स्पर्धेचे दुसरे पर्व पार पडले. यामध्ये भाग्यश्री बोरसे (पुण्याची महाराणी), डॉ. सिमरन थोरात (पुण्याची स्वामिनी), रश्मी माळवदकर (पुण्याची मानिनी) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
“ऋणानुबंध’ संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक “प्रभात’ माध्यम प्रायोजक होते. तर “कलाक्षेत्रम’, “तनिष्क’, “ढेपेवाडा’, “मयुरी मेकअप स्टुडीओ’, “टाईम्स ऍन्ड ट्रेन्ड ऍकॅडमी’ स्पर्धेचे प्रायोजक होते. नीता मोकाशी, रत्ना दहिवेलकर आणि श्रृती पाटोळे यांनी या स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेत्री सायली राजहंस, शांतीदूत फाउंडेशनच्या विद्या जाधव, विशेष शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे आदी उपस्थित होत्या.
“पुण्याची महाराणी 2019′ या स्पर्धेत एकूण 56 जणींनी सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीसाठी स्पर्धकांना “इंडो-वेस्टर्न’ही “थीम’ देण्यात आली होती. यामध्ये स्पर्धकांनी आत्मविश्वासाने परिचय करुन देत उपस्थितांची मने जिंकली. तर दुसऱ्या फेरीमध्ये “नऊवारी’च्या विशेष फेरीमध्ये केलेल्या “रॅम्पवॉक’नंतर स्पर्धकांनी “पिंगा’या गीतावर ठेका धरला. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये निवड झालेल्या “टॉप टेन’ स्पर्धकांनी परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची ठामपणे उत्तरे दिली.
स्पर्धेमध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासातून परीक्षकांचे मन जिंकत अश्विनी देसाई (चंद्रमुखी), रेवती नातू (मधुरभाषिणी), अर्चना कुलकर्णी (उत्साह वर्धिनी), पल्लवी चौधरी (उद्योग वर्धिनी), सुनिता कुलकर्णी (मृगनयनी), नंदिनी आल्हाट (केशरंजना), वृंदा भंडारी (गजगामिनी), दीपा शिंदे (सुहास्यवदनी) यांनी बक्षिसे पटकाविली.
विविध सौंदर्य स्पर्धांच्या विजेत्या श्रृती पाटोळे, पूजा जाधव आणि सुप्रिया ताम्हाणे यांनी
स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले