Dahiwadi Gondavale Road Closed – गोंदवले बुद्रुकजवळील मोधळ ओढ्यावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामामुळे दहिवडी– गोंदवले रस्त्यावरील वाहतूक आजपासून (दि. २) काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जारी केले आहेत. दहिवडी ते गोंदवले बुद्रुक या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये. यासाठी येत्या आज सकाळी दहा वाजल्यापासून दि. २५ मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. दहिवडीहून गोंदवले बुद्रुककडे जाणारी सर्व वाहतूक मायणी चौक, खांडसरी चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच म्हसवड व गोंदवले बुद्रुककडून दहिवडीकडे येणारी वाहतूक आप्पा महाराज चौक, खांडसरी चौकातून वळवण्यात येणार आहे. या दरम्यान दहिवडी ते गोंदवले बुद्रुक या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बदल करण्यात आलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.