Yogurt and Curd Which is Better: दही की योगर्ट? आरोग्यासाठी नेमकं काय फायदेशीर, जाणून घ्या दोन्हींचे फायदे आणि फरक
Yogurt and Curd Which is Better पचनशक्ती चांगली राहावी, शरीराला पुरेसं प्रोटीन आणि कॅल्शियम मिळावं यासाठी दही आणि योगर्टचा आहारात समावेश केला जातो.

Yogurt and Curd Which is Better: आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे अनेकजण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतात. पचनशक्ती चांगली राहावी, शरीराला पुरेसं प्रोटीन आणि कॅल्शियम मिळावं यासाठी दही आणि योगर्टचा आहारात समावेश केला जातो. मात्र, दही आणि योगर्ट एकच आहेत का, त्यांच्यात नेमका काय फरक आहे आणि दोघांपैकी आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो.
दही आणि योगर्टमध्ये काय फरक?
दही साधारणपणे दूध कोमट करून त्यामध्ये थोड जुनं दही घालून तयार केलं जातं. त्यातील जिवंत सूक्ष्मजीव दुधाचं आंबवण म्हणजेच फर्मेंटेशन करतात. त्यामुळे दह्याला त्याची खास चव आणि पोत मिळते. दुसरीकडे, योगर्ट ठराविक प्रकारच्या बॅक्टेरियल कल्चरचा वापर करून नियंत्रित तापमानात तयार केलं जातं. त्यामुळे दही आणि योगर्टच्या चवीत, पोतात आणि त्यातील बॅक्टेरियांच्या प्रकारात फरक असू शकतो. मात्र, प्रत्येक दही किंवा योगर्टमध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण सारखेच असेल असं नाही.
पचन आणि गट हेल्थसाठी काय चांगलं?
दही आणि योगर्ट हे दोन्ही फर्मेंटेड डेअरी पदार्थ आहेत. त्यामुळे त्यामध्ये असलेले काही घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र, प्रोबायोटिक फायदा हा त्यामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, यावर अवलंबून असतो. योगर्ट खरेदी करताना पॅकेटवर ‘Live and Active Cultures’ अशी माहिती आहे का, हे पाहणं उपयोगी ठरू शकतं. घरचं ताजं दहीही संतुलित आहाराचा भाग बनवता येऊ शकतं.

Yogurt and Curd
पचनासाठी दही की योगर्ट?
फर्मेंटेशन प्रक्रियेमुळे दही आणि योगर्टमध्ये दुधाच्या तुलनेत लॅक्टोजचं प्रमाण कमी असू शकतं. त्यामुळे काही लोकांना दूध पिण्यापेक्षा हे पदार्थ पचायला सोपे जाऊ शकतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीची सहनशीलता वेगळी असते. लॅक्टोज इनटॉलरन्स किंवा डेअरीशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या शरीराला कोणता पदार्थ योग्य ठरतो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर काय निवडाल?
दही किंवा योगर्ट यापैकी कोणताही पदार्थ फक्त नाव पाहून निवडणं योग्य नाही. त्यातील कॅलरी, प्रोटीन आणि अतिरिक्त साखरेचं प्रमाण तपासणं महत्त्वाचं आहे. साधं, घरचं दही किंवा अतिरिक्त साखर नसलेलं प्लेन योगर्ट चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारातील फ्लेवर्ड योगर्टमध्ये अतिरिक्त साखर आणि कॅलरी जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅकेटवरील पोषणमूल्यांची माहिती आणि घटकांची यादी वाचणं आवश्यक आहे.
मग दही की योगर्ट, काय निवडावं?
जर घरचं ताजं आणि साधं दही उपलब्ध असेल, तर ते आहारात सहज समाविष्ट करता येतं. दुसरीकडे, योगर्ट घेताना प्लेन, कमी साखर असलेल आणि चांगलं प्रोटीन असलेला पर्याय निवडणं योग्य ठरू शकतं.
म्हणूनच दही किंवा योगर्ट यापैकी एकच पदार्थ प्रत्येकासाठी सर्वात चांगला आहे, असं ठामपणे सांगता येणार नाही. आपल्या आहाराच्या गरजा आणि शरीराची सहनशीलता यानुसार निवड करणं अधिक महत्त्वाचं आहे.
लॅक्टोज इनटॉलरन्स, डेअरी अॅलर्जी किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.





