पिंपरी | अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत दहीहंडी साजरी

सांगवी, (वार्ताहर) – राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, लिटिल फ्लाॅवर इग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात बालचमुंनी दहीहंडीचा आनंद लुटला.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणा गीत’ सादर केले. बालचमूंनी राधा – कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत विविध गाण्यांवर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी विषयावर ग्रेटिंग कार्ड बनविले होते.





