प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकीत येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतच्या एकूण तीन प्रभागातील १२ जागांपैकी सर्वाधिक ५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजय मिळवत वर्चस्व प्राप्त केले. काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला केवळ ३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्रमांक १ कळस-धानोरी-लोहगाव उर्वरितमध्ये ३३, प्रभाग क्रमांक २ फुलेनगर- नागपूर चाळमध्ये ४१ तर प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगरमध्ये ४३ याप्रमाणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे स्टेडीयमध्ये मतमोजणी झाली. प्रभाग १ साठी ३ , प्रभाग २ साठी ४, प्रभाग ६ साठी ४ याप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या. सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री ७ वाजता संपली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी अंतिम निकाल जाहीर केले.सन २०१७ मधील निवडणुकीत क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भाजपने ६, राष्ट्रवादी काँग्रेसने २, शिवसेनेने ३, एमआयएमने १ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून भाजपने ३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली. प्रभाग २ मधील चारही जागा राष्ट्रवादीने, तर प्रभाग ६ मधील चारही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती (महिला) या अ गटात राष्ट्रवादीच्या अश्विनी भंडारे यांना २० हजार ४४३ मते मिळाली. त्यांनी आरती चव्हाण यांचा ४ हजार ५४ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना १६ हजार ३८९ मते मिळाली. अनुसूचित जमाती या ब गटात भाजपच्या संगीता दांगट यांना २५ हजार ४६२ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नूतन प्रताप यांना १७ हजार ७५९ मते मिळाली. दांगट यांनी ७ हजार ७०३ मताधिक्याने विजय मिळविला. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या क गटातून राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे यांनी २४ हजार ४५३ मते मिळवली. त्यांनी भाजपच्या वंदना खांदवे यांचा ५ हजार ३२७ मतांनी पराभव केला. खांदवे यांना १९ हजार १२६ मते मिळाली. रेखा टिंगरे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त करत बाजी मारली आहे. सर्वसाधारण या ड गटात भाजपचे अनिल टिंगरे व राष्ट्रवादीचे शशिकांत टिंगरे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनिल टिंगरे यांना २३ हजार ६२६, तर शशिकांत टिंगरे यांना २१ हजार २३९ मते मिळाली. यात अनिल टिंगरे यांनी २ हजार ३८७ मताधिक्य प्राप्त केले. या विजयाच्या माध्यमातून यंदा अनिल टिंगरे यांनी हॅट्ट्रिक प्राप्त केली आहे. राष्ट्रवादीने चारही जागा जिंकल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती (महिला) या अ गटातुन राष्ट्रवादीच्या नंदिनी धेंडे यांना १६ हजार ६६२, तर भाजपच्या रेणुका चलवादी यांना १३ हजार ४६० मते मिळाली. धेंडे यांनी ३ हजार २०२ मताधिक्याने विजय मिळविला. सर्वसाधारण (महिला) या क गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत १९ हजार ३५७, तर अपक्ष उमेदवार आदिती बाबर यांना ७ हजार १६९ मते मिळाली. यात सावंत तब्बल १२ हजार १८८ एवढे मताधिक्य मिळवत या निवडणुकीत त्यांनी हॅट्ट्रिक मिळविली आहे. सर्वसाधारण या ड गटातून राष्ट्रवादीच्या सुहास टिंगरे यांना १६ हजार ३५९, तर भाजपच्या राहुल जाधव यांना १२ हजार ९७० मते मिळाली आहे. टिंगरे यांनी ३ हजार ३८९ मताधिक्य मिळवत बाजी मारली आहे. भाजपच्या वाघमोडे यांचा १३८ मतांनी पराभव प्रभाग २ मधील नागरिकांच्या मागासवर्ग या ब गटातून राष्ट्रवादीच्या रवी टिंगरे यांना १५ हजार ३२१, तर भाजपच्या सुधीर वाघमोडे यांना १५ हजार १८३ मते मिळाली. या दोघांत अतिशय अतितटीची लढत झाली. वाघमोडे यांचा केवळ १३८ मतांनी पराभव झाला. त्यावर वाघमोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही.