Cyclone Ditwah : तमिळनाडूमध्ये दित्वाह चक्रीवादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून सुमारे ५७ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. नागापट्टिनम, तिरुवरूर आणि मयिलादुथुराईला सर्वाधिक फटका बसला आहे. तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकणारे चक्रीवादहामुळे राज्यातील किनारी भाग आणि कावेरी जिल्ह्यांत रविवारी मुसळधार पाऊस झाला. रामनाथपुरम आणि नागपट्टणम या दोन जिल्ह्यांनाही मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सलग दुसऱ्या दिवशी रामेश्वरममध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. नागपट्टणममध्ये काही झाडे उन्मळून पडली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन यांनी सांगितले की, तुतीकोरिन आणि तंजावरमध्ये भिंत कोसळल्याने प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, तर मयिलादुथुराईमध्ये २० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. त्रिभुज प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये जवळपास २३४ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या भागात मदत आणि पुनर्वसनाचे काम करण्यासाठी या पथके पाठवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. पुद्दुचेरीतील कराइकल येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९ सेमी, तर रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मयिलादुथुराई जिल्ह्यातील सेम्बानारकोइल येथे १७ सेमी पाऊस पडला आहे. दरम्यान, राज्य सरकार युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सुमारे २८ आपत्ती प्रतिसाद पथके, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांचा समावेश आहे. आम्ही इतर राज्यांतून आणखी १० पथके एअर लिफ्ट करण्याची योजना आखली आहे. हवाई दल आणि तटरक्षक दलाला सतर्क केले आहे, असे मंत्री म्हणाले.