Cyclone Ditwah – दितवाह चक्रिवादळामुळे श्रीलंकेचे तब्बल ६ ते ७ अब्ज डॉलर इतके प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान श्रीलंकेच्या एकूण सकल देशांतर्गंत उत्पन्नाच्या ३ ते ५ टक्क्यांइतके आहे, असे पुनर्वसन कार्यावर देखरेख करणाऱ्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे. दितवाह चक्रिवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ४६५ लोक ठार झाले असून ३६६ जण अजूनही बेपत्ता आहेत. मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, पूर, भूस्खलन झाल्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांचा अन्य देशाबरोबरचा संपर्क तुटला असून आपत्ती प्रतिसाद क्षमतेवर मोठा ताण आला आहे. देशातील सर्व २५ जिल्ह्यांना या चक्रिवादळाचा फटका बसला आहे. १४ लाखांपेक्षा जास्त लोक या वादळामुळे प्रभावित झाले आहेत. देशभरात १,४४१ आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या असून २ लाख ३३ हजार लोकांनी या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळामुळे झालेले नुकसान ६ ते ७ अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे, असे अत्यावश्यक सेवांचे महाआयुक्त प्रबथ चंद्रकिर्ती यांनी म्हटले आहे. मदत आणि बचाव कार्याचा वेग वाढवण्यासाठी नवीन कायदेशीर उपाययोजना करण्यात येणार आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्पुरत्या काळासाठी गोठवलेल्या भाज्या आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात मोबाईल सेवांचे ४ हजार टॉवर कोसळले आहेत. नादुरुस्त झालेली दूरसंवाद सेवा गुरुवारपर्यंत दुरुस्त केली जाणे अभिप्रेत आहे.