गेल्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेले ’दाना’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीला धडकले. त्याचे पडसाद ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील किनारी भागांत राहणार्या लोकांवर उमटले. चक्रीवादळामुळे अनेक आपत्कालीन समस्या उद्भवतात आणि त्यात स्थानिक लोकजीवन विस्कळीत होते. 4 ते 5 तासांचा निसर्गाचा हाहाकार अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतो. जीवितहानी, वित्तीय हानी, कोलमडलेल्या पायाभूत सुविधा, विस्कटलेले जनजीवन अशा अनेक समस्यांना दुर्घटनाग्रस्त लोकांना तोंड द्यावे लागते. चक्रीवादळासारखी एक घटना कित्येकांचा पाठीचा कणा मोडून टाकते, ज्यातून सावरून पुन्हा नव्याने सुरुवात करणे, जिद्दीने उभारी घेणे सामान्य माणसाला प्रचंड जिकिरीचे जाते. नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘दाना’ चक्रीवादळामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील किनारपट्टीच्या जिल्ह्यांना फटका बसला. शिवाय झारखंड, बिहार आणि आंध्रप्रदेशच्या काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही की राज्यातील समुद्रकिनारपट्टीवरही कोणताच विपरीत परिणाम झाला नाही ही एक जमेची बाजू ठरली. तूर्तास महाराष्ट्रास याचा संभाव्य धोका नसला, तरी मान्सूनवर फरक पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. ‘दाना’ चक्रीवादळ भितरकनिका आणि धामरामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धडकले. मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने ओडिसा आणि पश्चिम बंगालला त्याचा तितका फटका बसला नाही. प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊन अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही घरांचेही नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळांवरील काही दुर्दैवी अपघात वगळता मोठी जीवितहानी झाली नसून आर्थिकहानीचे प्रमाणही अल्प होते. ही दिलासादायक बाब ठरली असली, तरी प्रत्यक्ष जनजीवनावर मात्र याचा बराचसा परिणाम झालेला दिसून येतो. किनारपट्टी भागांत सुरुवातीला ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे नंतर ताशी 100-120 किलोमीटर वेगाने वाहू लागले. हे चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीपासून सुरू होऊन पुढे कोलकाताच्या दिशेने सरकत गेले. या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात म्हणजे ‘सिव्हियर सायक्लोन स्टॉर्म’मध्ये झाले. त्यामुळे पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांत वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस पडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. 14 जिल्ह्यांमध्ये सुमारे 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विस्कळीत झालेली विमानांची उड्डाणे आणि रेल्वेसेवा पुन्हा नियमितपणे सुरू झाली. पर्यटकांनादेखील येथून परत पाठवण्यात आले होते. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या परिसरातून सर्व तात्पुरते तंबू काढण्यात आले. कोणार्क मंदिर देखील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ओडिसा डीझास्टर रॅपिड फोर्स आणि अग्निशमन दल याठिकाणी तैनात होते. मदत शिबिरे देखील उभारण्यात आली. शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आली. तर सरकारी कर्मचार्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, पश्चिम बंगालमधील 3.5 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून 2,43,374 लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला. पाच-सहा तासांच्या घोंघावत्या वादळाची तीव्रता कमी झाली. जेव्हा ऊबदार समुद्राच्या पाण्यावर कमी दाबाच्या पटट्यांतील दमट हवा वरच्या दिशेने वाहते तेव्हा ढग तयार होतात जे वादळ बनतात. जसजसे ते वाढत जाते, तसतसे चक्रीवादळातील हवा फिरते. प्रचंड वेगवान आणि बर्याचदा विध्वंसक हवेच्या अभिसरणाने ओळखल्या जाणार्या कमी-दाबाच्या पट्ट्याभोवती वातावरणातील बदलांमुळे चक्रीवादळे उद्भवतात. चक्रीवादळ विध्वंसक असून त्याचा हवामानावर मोठा प्रतिकूल परिणाम होतो. जेव्हा कोणतेही चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकते तेव्हा ते बरेच धोक्याचे इशारे देतात. या धोक्यांमध्ये मुसळधार पाऊस, वेगवान वारे, सोसाट्याचे वादळ आणि अगदी चक्रीवादळ यांचाही समावेश होतो. चक्रीवादळाच्या वेळी समुद्राचे पाणी किनार्यावर ढकलले जाते, त्यामुळे किनार्यालगतचा भाग पाण्याखाली जातो. त्यातच मुसळधार पावसामुळे अंतर्गत भागातही पूरस्थिती निर्माण होते. याचा सर्वात मोठा धोका कोणाला असेल तर तो म्हणजे समुद्रकिनारपट्टी भागातील स्थानिक लोकांना. हवामान विभाग वेळोवेळी प्रतिकूल हवामानाचा अंदाज घेऊन स्थानिकांना सतर्कता बाळगण्याचे आव्हान करत असले, तरी नैसर्गिक संकटापुढे माणूस काहीही करू शकत नाही. जिथे किनार्यालगतच्या मोठमोठ्या इमारतीदेखील डगमगू लागतात तिथे सामान्य माणसांच्या कच्च्या घरांचा टिकाव लागण्याची कसली बिशाद. चक्रीवादळाचे शक्तीशाली वारे टोलेजंग इमारती, बैठी घरे, मोठमोठी झाडे आणि पॉवर लाइन नष्ट करू शकतात. शिवाय हवेत उडणारी घरांची छप्परे, लोखंडी पत्रे खूपच धोकादायक ठरू शकतात. चक्रीवादळाशी संबंधित वारे वादळाच्या केंद्राजवळ सर्वात तीव्र असतात. वादळाच्या लाटेमुळे किनारपट्टीपासून 40 किलोमीटरपर्यंत किंबहुना त्यापेक्षाही जास्त अशा विस्तृत किनारपट्टीवर पूर परिस्थिती निर्माण करू शकतात. मच्छीमारांना काही दिवस समुद्रात मासेमारी करण्यास जाता न आल्याने त्याचा मासेमारीवर परिणाम होतो, शिवाय छोट्या किरकोळ मासे विक्रेत्यांचे अधिक आर्थिक नुकसान होते. मे 2022 मध्ये आलेल्या ‘असनी’ चक्रीवादळाचा असाच प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांतील मासेमारीवर झाला होता. 2019 मध्ये ‘क्यार’ चक्रीवादळामुळे रत्नागिरीतील 50 ते 60 मासेमारी बोटी भरकटल्या होत्या. चक्रीवादळांमुळे भारतात घडलेल्या अशा अनेक घटना आहेत ज्यांचा थेट प्रतिकूल परिणाम लोकजीवनावर झालेला आहे. जून 2019 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गुजरातमधील तीळ, हरभरा, बाजरी आणि भुईमुगाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ‘यास’ चक्रीवादळाचा तेल आणि वायू उद्योगावर परिणाम झाला होता. मे 2021 मध्ये पुन्हा ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला. अशाप्रकारे पिकांचे नुकसान होऊन अन्नपुरवठ्यात कमतरता येते. त्यामुळे किमती वाढतात आणि याची पुन्हा एकदा झळ बसते ती सामान्य माणसालाच. या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे स्थलांतर होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनावर, उपजीविकेवर, व्यापार, उद्योग-धंद्यांवर विपरीत परिणाम होतो. लोकांना त्यांच्या घरातून विस्थापित व्हावे लागल्याने त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आरोग्य सेवा, वीज, पाणीपुरवठा, दूरसंचार यांमध्ये व्यत्यय येतो. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने सामन्यांचे हाल होतात. महापुरामुळे पिण्याच्या पाण्याचे साठे दूषित होऊन त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. चक्रीवादळे बरेच दिवस, अगदी आठवडेदेखील चालू राहू शकतात, त्यामुळे संभाव्य धोके सहन करण्याखेरीज स्थानिकांकडे पर्याय उरत नाही. जरी सरकारमार्फत विविध योजना लागू होत असल्या, नुकसानभरपाई मिळत असली तरी आयुष्यभर काबाडकष्ट करून निर्माण केलेल्या गोष्टी पुन्हा नव्याने उभे करणे सरतेशेवटी अवघडच. आपल्या देशाची दक्षिण सीमा तिन्ही बाजूने समुद्राला लागून असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना वारंवार अशा धोक्यांचा सामना करावा लागतो. वारंवार निर्माण होणार्या चक्रीवादळांपासून संरक्षण करण्यासाठी भारताला ‘ब्लू रेव्होल्युशनची’गरज भासते आहे का? असा विचार मनात डोकावून जातो.