Cyclone Dana: ‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने; पश्चिम बंगाललाही सतर्कतेचा इशारा

भुवनेश्वर/कोलकाता – बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. तसेच पश्चिम बंगाललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू झाला असून ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रवादळानंतर वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल. (Cyclone Dana)
बंगालच्या उपसागरात उगम पावलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ धडकेल. ही प्रक्रिया किमान पाच तास तरी चालेल आणि त्यानंतर ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना येथून परत पाठवण्यात आले आहे.
पुरीच्या जगन्नाथ मंदिर परिसरातून सर्व तात्पुरते तंबू काढण्यात आले आहेत. येथील कोणार्क मंदिर देखील दोन दिवसांपासून बंद आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मदत शिबिरे देखील उभारण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयेदेखील पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील 3.5 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून 2, 43,374 लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.





