Cyclone Bualoi : बुआलोई चक्रिवादळाचा व्हिएतनामला फटका; 17 जणांचा मृत्यू

हनोई (व्हिएतनाम) : रागास चक्रिवादळाचा फटका बसल्यानंतर काही दिवसातच बुआलोई चक्रिवादळाच्या तडाख्यामुळे व्हिएतनाममध्ये सार्वजनिक जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. रागास वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे व्हिएतनाममध्ये पूर आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या होत्या. आता बुआलोई वादळामुळे त्याचे प्रमाण आणखी वाढले आहे.
या चक्रिवादळामुळे देशात मृतांची संख्या १९ झाली आणि आणखी काही जण बेपत्ता झाले आहेत. गेल्या २४ तासांत व्हिएतनामच्या काही भागात ३० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, असे राष्ट्रीय हवामान संस्थेने मंगळवारी सांगितले. मुसळधार पाऊस सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले आहे. त्यामुळे सोन ला आणि लाओ कै प्रांतांच्या उत्तरेकडील पर्वतांपासून मध्य न्घे अन प्रांतापर्यंतचे रस्ते तुटले आणि या भागाशी असलेला संपर्क तुटला आहे.
मुसळधार पाऊस आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे उत्तरेत मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे. येन बाई येथील थाओ नदी रात्रीतून आपत्कालीन पातळीपेक्षा खूपच वर गेली. त्यामुळे घरांमध्ये एक मीटर उंचीपर्यंत पाणी शिरले आणि लोकांना स्थलांतर करावे लागले. राजधानी हनोईमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते आणि शहरातून जाणाऱ्या रेड नदीजवळील लोकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रशासन अजूनही आठ मच्छिमारांसह १३ बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बुआलोईमुळे शुक्रवारपासून फिलीपिन्समध्ये किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे.





