Cyclone Akvan : चक्रीवादळ अकवानचा ओडिशाला तडाखा! 90 किमी वेगाने वारे; अनेक राज्यांना पावसाचा इशारा
Cyclone Akvan : अकवान चक्रीवादळ ओडिशाच्या गोपालपूरजवळ धडकले. बिहार, झारखंड, बंगालसह अनेक राज्यांत पाऊस आणि उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा.

Cyclone Akvan : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अकवान’ चक्रीवादळ शुक्रवारी (२० नोव्हेंबर) सकाळी ओडिशातील गोपालपूरजवळ किनारपट्टीवर धडकले. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर होता. वाऱ्यांचे झोत ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचले.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, किनारा ओलांडल्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, त्याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये जाणवणार आहे.
ओडिशामध्ये गेल्या २४ तासांत २१ सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये २० व २१ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.
बिहारमध्ये २१ नोव्हेंबरला विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे.
छत्तीसगड, मध्य प्रदेश, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही पुढील काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात २२ आणि २३ नोव्हेंबरला दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणालाही धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
मात्र, हवामान विभागाच्या दुपारी १.४० वाजताच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, ओडिशातील चक्रीवादळाचे रूपांतर ११.३० वाजता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले होते




