Cycle Wari: देहू ते पंढरपूर सायकल वारीचा नवा रेकॉर्ड! विठ्ठलनामाच्या गजरात २३५० सायकलस्वारांनी रचला इतिहास
Cycle Wari: ३०० हून अधिक महिला आणि १०० बालसायकलस्वारांनी विठ्ठल नामाच्या गजरात पूर्ण केली २३५ किलोमीटरची सायकल वारी.

Cycle Wari – श्रद्धा, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम असलेली इंडो ॲथलेटिक्स सोसायटीची दहावी ‘पुणे-पंढरपूर सायकल वारी’ यंदा विक्रमी उत्साहात पार पडली. देहू येथील गाथा मंदिरातून सुरू झालेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत नवा इतिहास रचला. पहाटे विठ्ठल नामाच्या गजरात वारीला सुरुवात झाली. सहभागी सायकलस्वारांनी देहू ते पंढरपूर हे २३५ किलोमीटरचे अंतर एका दिवसात पूर्ण केले.
देशातील विविध राज्यांतून आलेल्या सायकलप्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेतला. विशेष म्हणजे ३०० महिला आणि १०० हून अधिक बालसायकलस्वारांनीही वारी यशस्वीपणे पूर्ण केली. २०१६ मध्ये अवघ्या सात सायकलस्वारांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाने दहा वर्षांत मोठी झेप घेतली आहे. दरवर्षी वाढणाऱ्या सहभागामुळे ही वारी आता देशातील सर्वात मोठी सायकल वारी म्हणून ओळखली जात आहे.
देहू, निगडी, नाशिक फाटा, हडपसर, उरुळी कांचन, भिगवण, इंदापूर आणि टेंभुर्णी मार्गे पंढरपूर असा वारीचा मार्ग होता. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी आणि विविध संस्थांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरणपूरक वाहतूक आणि वारकरी संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. विठ्ठल भक्ती आणि सायकलिंगचा सुंदर संगम अनुभवत हजारो सायकलस्वारांनी यंदाची वारी संस्मरणीय केली.




