प्रभात वृत्तसेवा पुणे – हाॅटेलमधील खोली ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करणे एका महिलेला महागात पडले. चोरट्यांनी महिलेच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून दोन लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेच्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय महिला श्री जोगेश्वर मंदिर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. महिलेला परगावी जायचे असल्याने तिने ऑनलाइन पद्धतीने हाॅटेलमधील खोली आरक्षित करण्यासाठी संकेतस्थळावरून मोबाइल क्रमांक घेतला. मात्र, संकेतस्थळावरील मोबाइल क्रमांकात फेरफार करून सायबर चोरट्यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकला होता. महिलेने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी तिच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन महिलेच्या खात्यातून दोन लाख ३८ हजार रुपयांची रक्कम लांबविली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.