प्रभात वृत्तसेवा पुणे – देशभरात काही काळ लोन ॲपच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले होते. अशा प्रकरणांमुळे काही ठिकाणी आत्महत्येचे प्रकारही घडले होते. असे प्रकार कमी झाल्याचे चित्र असतानाच पुण्यातील एका नवविवाहित महिलेच्या धक्कादायक अनुभवामुळे लोन ॲप भामटे पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.नांदेड सिटी पोलीस ठाण्यात एका नवविवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला नृत्य वर्ग चालवते. तिला व्यवसायासाठी छोट्या रकमेचे कर्ज हवे असल्याने तिने पेटीएमवर लोनसाठी अर्ज केला होता. मात्र, यानंतर तिला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने तत्काळ लोन मंजूर करून देतो, असे सांगत केवायसीसाठी कागदपत्रे, फॉर्म, छायाचित्रे व सेल्फी पाठवण्यास सांगितले. त्यानंतर एक संशयास्पद लिंकही पाठवण्यात आली.पुन्हा फोन करून संबंधित व्यक्तीने तुमच्या पहिल्याच कर्जाची अडीच हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगितले व ती रक्कम भरल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही, असे सांगितले. महिलेने यापूर्वी कोणतेही कर्ज घेतले नव्हते, मात्र आर्थिक गरज असल्याने तिने अडीच हजार रुपये भरले. त्यानंतर पुन्हा फोन करून आरोपीने शिवीगाळ करीत आणखी एक हजार रुपयांचा हप्ता शिल्लक असल्याचे सांगितले. रक्कम न भरल्यास तिची छायाचित्रे समाजमाध्यमांवर अपलोड करण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने महिलेची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे तिला पाठवली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने तातडीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कॉल, लिंक किंवा ॲपवर वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.