प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची ३७ लाखांहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान तानाजीनगर, चिंचवड येथे घडली. कीर्तन मेहता, अंकिता, आदित्य शर्मा तसेच ए.यू. स्मॉल फायनान्स बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व अन्य खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंद्रशेखर विनायक चौधरी (वय ६०, रा. फ्लॅट क्र. ६, श्याम अपार्टमेंट, तानाजी नगर, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २७) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ दरम्यान आरोपींनी फिर्यादीला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत शेअर बाजार ट्रेडिंगचे आमिष दाखवले. मोबाइलवरून संपर्क साधून विविध खात्यांमध्ये एकूण ३७ लाख २३ हजार ८५० रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र नफा आणि जमा केलेली मूळ रक्कम न देता फसवणूक केली.