किव्ह – युक्रेनवर मोठा सायबर हल्ला झाला असून सर्व सरकारी संकेतस्थळे हॅक करण्यात आली आहेत. त्याच वेळी रशियाने युक्रेन सीमेवरील आपले सैन्य वाढवले असून अतिरिक्त 1 लाख फौजा तैनात केल्या आहेत. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊन युद्धाचे ढग जमू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
युक्रेनवर झालेला सायबर हल्ला कुणी केला, याचे कुठलेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा सायबर हल्ला रशियाने केला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. युक्रेनने पहिला संशय रशियावरच व्यक्त केला असून अमेरिकेनेही युक्रेनच्या बाजूने आपले वजन टाकले आहे.
युक्रेनच्या जवळपास सर्व महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. युक्रेन सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार विदेश मंत्रालय, कृषी मंत्रालय, शिक्षण मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या असून सर्व डेटा डिलिट करण्यात आल्याचे म्हटले आहे.
हॅकर्सनी दिलेल्या संदेशात “युक्रेनच्या नागरिकांनो, तुमच्या सरकारचा सर्व डेटा आता आमच्या ताब्यात असून तो सार्वजनिक करण्यात आला आहे. सर्व डेटा नष्ट करण्यात आला असून आता तो रिस्टोअर करणे शक्य नाही’ असे या संदेशात म्हटले आहे.
दुसरीकडे पुरावे नसल्यामुळे युक्रेनवरील सायबर हल्ला कुणी केला, हे सांगता येणार नाही. मात्र प्रत्येकजण कल्पना करू शकतो, असे म्हणत अमेरिेकनेही अप्रत्यक्षपणे रशियाकडेच इशारा केला आहे. या परिस्थितीमुळे तणाव वाढला असून युद्धाचे ढग जमू लागले आहेत.
दरम्यान, सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात छुपा संघर्ष सुरू आहे. युक्रेनची राजधानी किव्ह हे ऐतिहासिक शहर असून मॉस्कोएवढेच या शहराला महत्त्व आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचे स्वतंत्र अस्तित्व अनेक रशियन मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे.