World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.
एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ एकूण 109 वेळा भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी 50 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 55 सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत होते.
त्याचबरोबर विश्वचषकात दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने तीन सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेनेही या कालावधीत तीन सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आणि एक बरोबरीत राहिला.