World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
AUS vs SA Live: पावसामुळे खेळ थांबला…
कोलकातामध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेला उपांत्य फेरीचा दुसरा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 14 षटकांत 4 गडी गमावून 44 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेतले. पावसामुळे आज सामना पूर्ण झाला नाही तर उद्या राखीव दिवस असून उद्या सामना पूर्ण होईल.
आफ्रिकेला 24 धावांवर चौथा धक्का…
आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. मिचेल स्टार्कने कर्णधार टेंबा बावुमाला यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद केले. बावुमा याला खातेही उघडता आले नाही. सहाव्या षटकात आठ धावांवर दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला. क्विंटन डी कॉकला हेझलवूडकरवी कमिन्सने झेलबाद केले. त्याला 14 चेंडूत तीन धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 22 धावांवर पडली. एडन मार्कराम 20 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले. रॅसी व्हॅन डर डुसेन 31 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले.
आफ्रिकेनं टाॅस जिंकला…
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.