World Cup 2023 Final India vs Australia Ahmedabad : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली. या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व विजय खेचून आणला व त्याच क्षणी केवळ मैदानात उपस्थित असलेल्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांची निराशाच झाली. 2003 सालच्या स्पर्धेचीच जणू पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाने केली असेच आता म्हणावले लागेल. त्यावेळीही भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते व ऑस्ट्रेलियाने करंडक उंचावला होता. यावेळीही तेच घडले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावाजलेल्या फलंदाजांनी निराशा केली. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी अर्धशतके फटकावली तसेच स्वतः कर्णधार रोहितने या स्पर्धेत यापूर्वी केल्याप्रमाणेच धडाकेबाज प्रारंभ करून दिला. मात्र, पहिले 10 सामने रोहितने रचून दिलेल्या पायावर मोठ्या धावसंख्येचे शिखर उभे केलेल्या अन्य फलंदाजांना या सामन्यात तब्बल 30 षटके केवळ 2 चौकारच फटकावता आले. यावरून ऑस्ट्रेलियाने खेळपट्टीचा व भारताच्या भक्कम फलंदाजीचा कीती अचूक अभ्यास केला होता हे दाखवणारी गोलंदाजी केली. त्यांच्या एकाही गोलंदाजाने भारताच्या आक्रमक फलंदाजांना यशस्वी होऊ दिले नाही. #CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला ‘या’ चुका पडल्या महागात; जाणून घ्या…Final मध्ये भारतीय फलंदाज नेमकं कुठं चुकले… ज्या वेळी भारताच्या अडीचशे धावाही झाल्या नाहीत तेव्हाच पराभवाचा पहिला संकेत मिळाला होता. ऑस्ट्रेलियाची 3 बाद 47 अशी स्थिती बनल्यावर सामना काही क्षण भारताच्या बाजूने झुकलाही होता मात्र, हेड व लेबुशेन यांनी अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करत भारताच्या तोंडचा घास काढून घेत स्पर्धेच्या इतिहासातील सहावे विजेतेपद पटकावले. यावेळी संपूर्ण भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ व उपस्थित चाहते यांना आपल्या भावना आवरणे कठीण बनले होते. पंतप्रधानांच्या हस्ते करंडक प्रदान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्वविजेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला. त्यानंतर मोदी यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलिया संघाने पुढील काळात असेच यश मिळावे असे कौतुकाचे बोल मोदींनी यावेळी काढले. तसेच अंतिम सामन्यापर्यंत नेत्रदीपक प्रवास केलेल्या भारतीय संघाचाही गौरव केला.