#CWC2023 #ENGvNED : नेदरलँड्स विश्वचषकातून बाहेर पडणारा ठरला चौथा संघ, इंग्लंडचा मोठा विजय…

ICC ODI World Cup 2023 England vs Netherlands Match Results : गतविजेत्या इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषक 2023 चा 40 वा सामना पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. या पराभवासह नेदरलँड्स विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.
इंग्लंड संघाने विश्वचषकातील आठव्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण झाले आहेत. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ बाद 339 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 37.2 षटकांत 179 धावांवर गारद झाला. नेदरलँड्सकडून फंलदाजीत तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 38 आणि वेस्ली बॅरेसीने 37 धावा केल्या. सायब्रँडने 33 आणि बास डी लीडेने 10 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीदने प्रत्येकी तीन बळी घेतले. डेव्हिड विलीने दोन गडी बाद केले.
An emphatic win in Pune breaks the streak of five straight #CWC23 losses for England 👌#ENGvNED 📝: https://t.co/03fpOlFJkO pic.twitter.com/EPNbrecZVW
— ICC (@ICC) November 8, 2023
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंड संघाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजीत अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने 108 धावा केल्या. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे. डेव्हिड मलानने 87 आणि ख्रिस वोक्सने 51 धावा केल्या. जो रूटने 28, जॉनी बेअरस्टोने 15 आणि हॅरी ब्रूकने 11 धावा केल्या. डेव्हिड विली केवळ सहा, जोस बटलर पाच आणि मोईन अली केवळ चार धावा करू शकला.
नेदरलँड्स संघाकडून गोलंदाजीत बास डी लीडेने 10 षटकात 74 धावा देताना तीन बळी घेतले. याशिवाय आर्यन दत्त आणि व्हॅन बेक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर व्हॅन मिकरेनला 1 विकेट्स घेतली.




