Cocaine Seized : सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई ! मुंबई विमानतळावर 18 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत तब्बल 1 किलो 789 ग्रॅम कोकेन जप्त केले असून याची किंमत जवळपास 18 कोटी रुपये आहे. या प्रकरणामध्ये एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेला कोकेन दिल्लीमध्ये पोहोचवायचे होते, त्यासाठी तिला एक लाख केनियन शिलिंग (सुमारे 66 हजार रुपये) देण्याचे आरोपींनी मान्य केले होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली.
केनियातून एक महिला प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मंगळवारी सापळा रचला होता. संशयित महिला प्रवासी नैरोबीहून दोहामार्गे मुंबईत आली. त्यानंतर तिला संशयावरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले. महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडी बॅगेत एक किलो ७८९ ग्रॅमची पांढऱ्या रंगाची भुकटी सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी महिला इमिली कानिनी रोधाने कोकेन लपवण्यासाठी तिच्या बॅगेत विशेष कप्पे बनवले होते. त्याची किंमत १७ कोटी ८९ लाख रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. इमिली कानिनी रोधा हिच्या विरोधात या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. इमिली कानिनी रोधाला हे कोकेन दिल्लीला घेवून जाण्यास सांगण्यात आले होते. मिलिसन्ट नावाच्या महिलेने तिला संबंधीत कोकेन दिले होते, तसेच तिचे विमानप्रवासाचे तिकीटही याच महिलेने नोंदवले होते. इमिली कानिनी रोधाला कोकेन ज्या व्यक्तीला द्यायचे होते, त्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली असून सीमाशुल्क अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.





