ग्राहक सेवा केंद्र चालकाला लुटले

टाकळीभान – येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाला केंद्र बंद करुन घराकडे जात असताना श्रीरामपूर- नेवासा रोडवरील कापसे वस्तीजवळ दुचाकी आडवी लावून त्याच्या दुचाकीला लाथ मारुन त्याच्याकडील रोख रक्कम 70 हजार रुपये, लॅपटाप व इतर साहित्य असलेली बॅग हिसकावून अंधाराचा फायदा घेत नेवाशाच्या दिशेने आरोपी धुमस्टाईलने फरार झाले. सायंकाळी 7 वाजताच हा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, टाकळीभान येथील घनशाम गजानन औटी हे येथील बसस्थानक परिसरात ग्राहक सेवा केंद्र चालवतात. ते मंगळवारी (दि.13) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ग्राहक सेवा केंद्र बंद करुन आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना ही घटना घडली. यावेळी झालेल्या झटापटीत औटी यांनी एकाला पकडून ठेवले होते. मात्र त्यांचा पाय दुचाकीखाली गुंतला गेल्याने आरोपीने जोराचा हिसका मारुन सुटका करुन घेतली व तीनही आरोपी दुचाकीवर बसून निघून गेले.




