मकरसंक्रातीला फलटणच्या श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदी

फलटण (प्रतिनिधी) – मकरसंक्रांतीला गुरुवारी (दि. 14) फलटणच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून रामवसा घेण्यासाठी महिलांनी मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
फलटण तालुक्याचे आराध्यदैवत प्रभू श्रीराम मंदिरात सीतामाईचा रामवसा घेण्यासाठी मकरसंक्रातीला तालुक्यासह इतर जिल्ह्यातील हजारो महिला येतात; परंतु या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी मकरसंक्रातीला मंदिर परिसरात सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. श्रीराम मंदिरात प्राचीन काळापासून सीतामाईचा संसार ठेवण्यात आला आहे.
हा संसार पाहण्यासाठी व रामवसा घेण्यासाठी प्रतिवर्षी हजारो महिला येतात; परंतु यंदा करोनामुळे मंदिर परिसरात कोणीही येऊ नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.





