आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात संचारबंदी

सोलापूर – यंदाची आषाढी एकादशी 20 जुलै रोजी असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. यंदाच्या आषाढी वारीत नऊ दिवसांची संचारबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने दि. 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी लावण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रस्तावही सादर केला आहे. करोनाची भीती पाहता प्रशासनाने यंदाची आषाढी वारी रद्द केलेली आहे.
तरी काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. वारीच्या निमित्ताने येत्या 17 तारखेपासून ते 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहर व परिसरातील दहा गावांत संचारबंदी ठेवण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी घेतला आहे.
आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यंदा पंढरपुरात नऊ दिवसांची संचारबंदी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार येथील चंद्रभागा नदी परिसरातही 144 कलम लागू करण्यात येणार आहे, तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे.
संचारबंदीच्या काळात परवानगी नसलेल्या भाविकाला कोणत्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. 20 जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाही.





