नागपुरमधील संचारबंदी पूर्णपणे मागे; शहराचे वातावरण पूर्वपदावर

Nagpur News | छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन झालेल्या वादानंतर 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल उसळली होती. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर संवेदनशील भागांतील संचारबंदी रविवारी पूर्णत: मागे घेण्यात आली आहे. सहा दिवसांच्या तणावानंतर शहराचे वातावरण पूर्वपदावर आले आहे.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन लवकरच संचारबंदी हटवण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याबाबत निर्णय घेण्यात आला. गुरुवारी नंदनवन आणि कपिलनगर हद्दीतील संचारबंदी मागे घेण्यात आल.
शनिवारी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, आणि इमामवाडा या पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णपणे हटविण्यात आली, तर कोतवाली, तहसील, गणेशपेठ या तीन ठाण्यांच्या हद्दीत केवळ तीन ते सात या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. यशोधरानगरात संचारबंदी कायम होती. दरम्यान, रमजान ईद आणि गुढीपाडवा असल्याने काही व्यापाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन संचारबंदी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार रविवारी संचारबंदी संपूर्णत: उठवण्यात आली आहे. Nagpur News |
दंगलखोरांना सोडणार नाही; फडणविसांचा इशारा
दरम्यान, आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना सोडणे हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Nagpur News |
हेही वाचा:





