fbpx

पंढरपुरात कार्तिकी यात्रेतही संचारबंदी

4 दिवस एसटी बस सेवाही बंद

पंढरपूर – कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवादेखील बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. करोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पंढपूरमध्ये 22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून 26 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या रात्री 12 वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

जे भाविक अथवा दिंड्या पंढरपूरच्या वाटेकडे निघाले आहेत त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच या दिंड्या व भाविकांना परत पाठविण्यात येणार आहेत. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत पोहोचू नये यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केले जाणार आहे.

दरम्यान, आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा केली. वारकरी संप्रदाय मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी करीत असला तरी करोनाचा वाढत धोका पाहून शासन व प्रशासन यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्‍या महाराज मंडळींना करोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही सवलत देता येईल का यावर सध्या प्रशासन विचार करीत आहे.

पुणे जिल्ह्यातून दिंड्या नाहीत…
कार्तिक वारीसाठी पुणे जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिंड्या दाखल होणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी हे आदेश जारी केले असून पंढरपूर येथे दाखल होणार नाहीत, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.