पुणे – करोना संसर्गाने शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. यामध्ये अत्यावस्थ बाधितांची संख्या वाढल्यामुळे रेमडेसिव्हर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) “रेमडेसिविर’च्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे रुग्णांना आता 1200 ते 2000 हजार रुपयांत “रेमडेसिविर’ मिळणार आहे.
बाजारामध्ये सिप्लाचे इंजेक्शन 4 हजार रुपये, झायडस हेल्थकेअरचे 2 हजार 800 रुपये, मायलन कंपनीचे 4 हजार 800, हेटेरो आणि डॉ. रेड्डीज लॅबचे प्रत्येकी 5 हजार 400 तसेच जुबिलंट जेनेरिक कंपनीचे 4 हजार 700 रुपये अशा किंमती आहेत. या विविध कंपन्याकंडून रुग्णालयांना तसेच औषध विक्रेत्यांना 1800 ते 1200 रुपयांना विक्री केली जाते. सध्या, या इंजेक्शनची मागणी पुन्हा वाढली असून, त्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली.
याबाबत अधिक माहिती देताना पुणे विभागाच्या एफडीएचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले की, विविध कंपन्यांकडून रुग्णालयांसह घाऊक विक्रेत्यांना एमआरपीपेक्षा कमी किंमतीत “रेमडेसिविर’ इंजेक्शनची विक्री केली जाते. परंतु, रुग्णालयाच्या किरकोळ औषध विक्रेत्यांकडून एमआरपीनुसार विक्री होत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडतो. या औषधांची विक्री करताना खरेदीची किंमत आणि त्यावर 10 टक्के नफ्यानुसार येणाऱ्या किंमतीला “रेमडेसिविर’ची विक्री करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, रेमडेसिव्हीरच्या किंमती कमी करण्याबाबत राज्याच्या एफडीएने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावाबाबत अद्याप हालचाल झाली नाही. मात्र, किंमती कमी होण्याचा निर्णय होईपर्यंत रुग्णांना कमी किंमतीत रेमडेसिव्हीर मिळावे अशी अपेक्षा आहे, असे एस. बी. पाटील यांनी सांगितले.