महाराष्ट्र भूमीच्या पटलावर नाथ, महानुभाव, दत्त आणि समर्थ या चार भक्ती संप्रदायांसोबत अत्यंत महत्त्वाचा आणि मराठी मनावर अधिराज्य करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय समजला जातो. स्वीकारण्यास सोपा, आचरण्यास तर त्याहूनही सोपा पण तत्त्वज्ञानाची बैठक असणारा, प्रेम-जिव्हाळा-वात्सल्य-आपुलकी या गोष्टींनी न्हाउन निघालेला आणि भक्ती पथावरून प्रामाणिकपणे निघाल्यास मुक्तीपर्यंत नेऊन सोडणारा हा संप्रदाय जणू मराठी माणसाच्या मनमानसावर गेली शेकडो वर्षे अधिराज्य गाजवताना दिसतो. श्री विठ्ठलाचे लोकदेवत्व हा साऱ्यांचा आवडीचा भाग आहे. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत श्री विठ्ठल असल्याने आज घराघरात विठ्ठलाचे पूजन केले जाते. परंतु मुळात विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहेत. ज्ञानदेव-नामदेव काळाच्या आधी भक्त पुंडलिकाची महती या भूमीवर गायिली जात होती. पुंडलिक हा श्रीकृष्णाची भक्ती करीत असे. या भक्तराजाला श्रीकृष्ण श्रीविठ्ठलाच्या रूपात भेटले. त्यापाठीशी एक आख्यायिका सांगितली जाते. पद्मपुराणातील या कथेचा सारांश असा की, शोडषवयात व त्यानंतर तारुण्यात पुंडलिक हा स्त्रीलंपट आणि मात्यापित्यांचा उपहास करणारा सामान्य माणूस होता. परंतु त्याच्या जीवनात एक दिवस मोठे परिवर्तन घडले. कुक्कुटस्वामी या महान तपस्वाची आणि त्याची भेट झाली. कुक्कुटस्वामींच्या व्यक्तिमत्त्वाचा पुंडलिकावर कमालीचा प्रभाव पडला आणि तो आमूलाग्र बदलला. पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला. पंढरपूर ही त्यांची कर्मभूमी. एक दिवस रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात गेली असता श्रीकृष्ण तिचा शोध घेत पुंडलिकाच्या घरी पोहचले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होते. त्यामुळे डाव्या हाताने त्यांनी देवाला उभे राहण्यासाठी वीट फेकली. सेवा संपल्यावर विटेवर उभ्या असलेल्या देवाला पुंडलिक यांनी वंदन केले. देवाची स्तुती केली. देव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकांस वर मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिकांनी “देवाने या रूपात असेच उभे राहावे, अज्ञानी जीवांचा उद्धार करावा आणि हे क्षेत्र माझ्या नावाने म्हणजे पुंडरीकपूर म्हणून प्रसिद्ध व्हावे” असा वर मागितला. देवाने तथास्तू म्हटले. खरं म्हणजे भागवत धर्माची पताका पुंडलिकांनी ही अशी रोवली. श्रीकृष्णाची भक्ती श्रीविठ्ठलापर्यंत येऊन पोहचली. नंतरच्या काळात ज्ञानदेव-नामदेवांचा उदय झाला. या काळातही पुंडलिक पांडुरंगाचा आद्यभक्त म्हणून प्रसिद्ध होता. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आणि भक्तराज पुंडलिक यांचे नाते भागवत पंथाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे आद्यरूप धारण करते. विठ्ठलाची भक्ती करणारा आद्यपुरुष पुंडलिक होय. ज्ञानेश्वरांनी वा इतर संतांनीही याचा उल्लेख आपापल्या काव्यात केलेला दिसतो. वारकरी संप्रदायाचे स्थूल मानाने विभाग करावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे करावे लागतात. 1. पुंडलिक ते ज्ञानदेवांपर्यंतचा काळ 2. ज्ञानदेव व नामदेव यांचा काळ 3. भानुदास व एकनाथांचा काळ 4. तुकाराम व निळोबांचा काळ 5. तुकारामांनंतरचा काळ संत बहिणाबाई एका अभंगात म्हणतात- “”संतकृपा झाली। इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया नामा तयाचा किंकर। तेणे केले हा विस्तार जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत तुका झालासे कळस। भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरुपणा केले ओजा” यातली “ज्ञानदेवे रचिला पाया’ ही ओळ पुंडलिकाच्या काळात निर्माण झालेल्या वारकरी संप्रदायाची नंतरच्या काळात ज्ञानेश्वरांनी भक्कम पायाभरणी करून या संप्रदायाचा घराघरात विस्तार करण्याच्या अनुषंगाने आपल्याला घ्यावी लागते. भक्तीचा मळा तत्त्वज्ञानाच्या अंगाने फुलविण्यासाठी ज्ञानदेवांनी केलेले अजोड कार्य आणि त्यांना नंतरच्या काळात मिळालेली इतर संतांची जोड या गोष्ट मराठी भूमीवर निर्माण झालेल्या सांस्कृतिक इतिहासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ठरली आहे. डॉ. विनोद गोरवाडकर