प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) येत्या ८ फेब्रुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील १३२ शहरांमध्ये आणि वीस भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. तर काही उमेदवार हे सीबीएसईकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात.सीबीएसईकडून सीटीईटीची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. सीटीईटी संदर्भातील अधिकृत माहिती https://ctet.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी निश्चित केली जाणारी शहरे या संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेली माहिती बारकाईने वाचावी लागणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज भरावेत, असे सीबीएसई कडून स्पष्ट करण्यात आले आहे.