उपमुख्यमंत्री पवार यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
पुणे – काही योजनांसाठी शासनाकडे निधी न मागता “सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्त्व निधी) निधीतून कामे करता येतात. त्यासाठी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडे यासाठी पाठपुरावा करावा. “सीएसआर’ निधीतून जिल्ह्यातील बसस्थानके, पोलीस स्टेशन, अंगणवाड्या इमारतींचे बांधकाम व आवश्यक विकास कामे करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
जिल्हा वार्षिक आराखडा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्यासाठी सन 2020-21साठी 104 कोटींची वाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार 625 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त निधीतून सर्व विभागांनी दर्जेदार व गतीने कामे पूर्ण करावीत. झालेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी करुन इमारत बांधकामांचा दर्जा तपासून घ्यावा. ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्यात येणार असून जिल्हा परिषदेने कामांचा दर्जा सुधारावा.
चुकीचे काम करणारे अधिकारी रडारवर
रस्त्यांची कामे दर्जेदार करा, असे सांगून चुकीच्या पद्धतीने कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रलंबित कामे मार्गी लावावीत. सूचनांची अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.