IPL Final 2023 GT vs CSK Live : अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण; आज तरी खेळ होणार का?

अहमदाबाद :- आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाया गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे. रविवारी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसाच्या सावटाखाली आजही सामना होऊ शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अहमदाबादमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ढगाळ वातावरण होते. AccuWeather च्या अहवालानुसार रात्री 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. मात्र, अहवालात पावसाची शक्यता नाही. रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये सध्या खूप उष्णता आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे काल रात्री 10.45 वाजल्यापासून पाऊस पडला नाही आणि 20-20 षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. नाणेफेकही वेळेवरच होईल.
दरम्यान, चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण चार सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने तीन आणि चेन्नईने केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या मोसमात या दोघांमध्ये दोन सामने झाले, त्या दोन्हीमध्ये गुजरात संघाने बाजी मारली. त्याचबरोबर या मोसमात दोन सामने खेळले गेले. मोसमातील सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात हार्दिकच्या संघाने विजय मिळवला होता. त्याचवेळी क्वालिफायर-1 मध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.


