CSK News : चेन्नई सुपर किंग्सने (CSK News) आयपीएल २०२६ च्या शेवटच्या टप्प्यात संघात महत्त्वाचा बदल केला आहे. इंग्लंडचा ऑलराउंडर जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा ऑलराउंडर डियन फॉरेस्टर याला करारबद्ध करण्यात आले आहे. सध्याच्या गुणतालिकेनुसार चेन्नई सुपर किंग्सने (CSK News) ११ सामन्यात ६ विजय मिळवले आहेत आणि १२ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिले आहे. उर्वरित तीन सामने जिंकल्यास संघाचे १८ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची आशा अधिक मजबूत होईल. अशा निर्णायक टप्प्यात डियन फॉरेस्टरसारख्या खेळाडूची भर पडणे संघासाठी मोठा बूस्ट ठरेल. कोण आहे डियन फॉरेस्टर? डियन फॉरेस्टर हा दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने जलद-मध्यम गतीने गोलंदाजी करणारा उत्कृष्ट बॅटिंग ऑलराउंडर (CSK News) म्हणून ओळखला जातो. घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याने जागतिक टी-२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. CSK ने दुखापतग्रस्त जेमी ओव्हरटनच्या जागी त्याला ७५ लाख रुपयांच्या कराराने संघात सामील केले आहे. CSK News जेमी ओव्हरटनने या हंगामात CSK साठी १० सामन्यात १४ विकेट्स घेतल्या होत्या आणि १३६ धावांचे योगदान दिले होते. त्याच्या जागी आलेला फॉरेस्टर संघाला मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देऊ शकतो. SA20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्सकडून खेळताना त्याने १९०.४७ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती आणि नाबाद ८० धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. त्याचबरोबर तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये रावळपिंडी संघाकडून खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये नाईट्स संघाकडून पहिल्याच लिस्ट-ए सामन्यात शतक झळकावले आणि ५ विकेट्स घेण्याची अद्भूत कामगिरी केली होती. सध्या तो नॉर्थ वेस्ट ड्रॅगन्स संघाकडून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे पुढील सामने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध १५ मे रोजी, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १८ मे रोजी (घरच्या मैदानावर) आणि गुजरात टायटन्स विरुद्ध २१ मे रोजी होणार आहेत.