पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाने (आयसीएसआय) जून 2021 मध्ये होणाऱ्या सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीएस फाउंडेशनची परीक्षा 5 व 6 जून रोजी, तर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षा 1 ते 10 जून या कालावधीत होणार आहे.
या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये परीक्षा देता आलेली नाही, ते जूनमध्ये देऊ शकतील. त्यासाठी “ऑप्ट आऊट’ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2021 पर्यंत आहे. यंदा करोनामुळे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीएस परीक्षा 21 ते 30 डिसेंबरदरम्यान देशभरात 262 केंद्रांवर होणार आहे. यंदा 45 केंद्रे नव्याने समाविष्ट झाली आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी संस्थेला परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करावी लागली आहे.
45 पैकी 26 वाढीव केंद्रे राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह भुवनेश्वर, कोलकाता, हैद्राबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथे आहेत. विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्याचे “आयसीएसआय’कडून स्पष्ट करण्यात आले.