प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – बारामतीजवळील वंजारवाडी परिसरातील जंगलात दारू पिताना दोन अनोळखी गटांमध्ये किरकोळ वादातून सुरुवात झालेली बाचाबाची अखेर गंभीर हाणामारीत परिवर्तित झाली. या घटनेत एकाला धारदार शस्त्राने जखम झाल्याचे समोर आले असून, बारामती तालुका पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे.वनक्षेत्रात दोन्ही गट काही अंतरावर दारू पित बसलेले असताना बोलाचाली झाली. वाद तीव्र होऊन दगड, हात, बुक्क्यांचा वापर करून भांडण सुरू झाले. यामध्ये गणेश लोणकर याला छाती, पाठ व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या. त्याच्या अंगावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध अनोळखी व्यक्तींच्या तक्रारी नोंदवल्या. संतोष पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत सुशील कुमार मिश्रा, भूपेंद्र सिंग, लोकेश दरपे (मूळ राजस्थान, सध्या बारामती) हे आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. लोकेश दरपे यांनी तक्रार दिल्यानुसार गणेश लोणकर (कसबा बारामती), संतोष जाधव, साहिल साळवे (आमराई, बारामती) हे आरोपी ठरले असून, त्यांच्यावर इच्छापूर्वक दुखापत केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेतील गुंतागुंत लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष तपास पथक तयार करून तपासाला गती दिली.घटनास्थळी पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे व सीसीटीव्ही तपास या आधारे दोन्ही बाजूंच्या आरोपींची ओळख पटवण्यात आली. अटक केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक विक्रम पवार, पोलीस चव्हाण, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, अमोल पवार यांनी केली. वंजारवाडी जंगल परिसरात घडलेल्या या मारहाणीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी पुढील घटनांना आळा घालण्यासाठी गस्त वाढवली आहे.