मुंबई – अमेरिकेने केवळ व्हेनेझुएलावर हल्लाच केला नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचा कारभार हाती घेण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोलंबिया, मेक्सिको, ब्राझील या देशांनी सावध राहावे असा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक देश अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यामुळे जागतिक चलन, शेअर, खनिज तेल बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येण्याची शक्यता वाढली आहे. आज सलग चौथ्या दिवशी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाले. सोमवारी रुपयाचा भाव आठ पैशांनी कमी होऊन 90.28 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. जागतिक राजकीय तणाव वाढल्यामुळे सुरक्षित चलन म्हणून डॉलरची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत डॉलर इंडेक्स सोमवारी 0.24 टक्क्यांनी वाढून 98.39 या पातळीवर गेला. आतापर्यंत डॉलर इंडेक्स बराच कमी झाला होता. आता तो वाढू लागला आहे. याचा परिणाम रुपयावरही झाला. मात्र खनिज तेलाचे दर कमी झाल्यामुळे रुपयावर जास्त नकारात्मक परिणाम झाला नाही. व्हेनेझुएलात दर्जेदार खनिज तेलाचा सर्वात जास्त साठा आहे. या साठ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना नियंत्रण हवे असल्याचे बोलले जाते. सध्या एकूण जागतिक पुरवठ्यात व्हेनेझुएलाचा वाटा केवळ एक टक्के आहे. जर अमेरिकेने तेलाचे साठे ताब्यात घेऊन त्याचा पुरवठा वाढविला तर खनिज तेलाच्या किमती कमी होऊ शकतात असे समजले जात आहे. प्रत्यक्षात सध्या अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. जर लॅटिन अमेरिकेचे देश अमेरिकेविरोधात उभा ठाकले आणि या देशांना चीन, रशिया, इराण या देशांनी सक्रिय पाठिंबा दिला तरतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करीत असल्यामुळे अशा परिस्थितीत भारताला बर्याच प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव वाढू शकतो असे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारता विरोधात रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल आणखी आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. याचाही परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला.