Crude Oil: अमेरिका आणि इजरायलने इराणवर हल्ला केल्यापासून एक महिन्यात जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर 45 टक्क्यांनी वाढले आहेत. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारत खरेदी करीत असलेल्या खनिज तेलाचा दर 27 फेब्रुवारी रोजी केवळ 73.2 डॉलर प्रति पिंप होता तो आता 45 टक्क्यांनी वाढून 106.2 प्रति बॅरल या पातळीवर गेला आहे. भारत आपल्या गरजेच्या 86 टक्के खनिज तेल आयात करतो. आखात जवळ असल्यामुळे आखातातून खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. त्याचबरोबर भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजेच्या 50% गॅस आखातातून खरेदी करतो. या दोन्ही बाबीवर मर्यादा आल्यामुळे भारताच्या इंधन सुरक्षिततेवर या घडामोडीचा नकारात्मक परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताला रशियाकडून आणि इतरांकडून खनिज तेल उपलब्ध होत आहे. मात्र यासाठी वाहतुकीचा आणि विम्याचा खर्च जास्त लागतो. यामुळे भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करावी लागत आहे. ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास भारतीय विकास दरावर याचा परिणाम शक्य आहे.