Economy : कच्चे तेल 100 डॉलरपार; रुपयाला मोठा धक्का, 95.08 वर घसरला
Economy : कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपार गेल्याने रुपयावर दबाव वाढला. रुपया 34 पैशांनी घसरून 95.08 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.

Economy : कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्याने महागाई आणि देशातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन बाहेर जाण्याची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम भारतीय रुपयावर झाला असून, रुपया 34 पैशांनी घसरून प्रति डॉलर 95.08 रुपयांवर बंद झाला. कमकुवत शेअर बाजार आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या विक्रीमुळेही रुपयावर दबाव राहिला.
पश्चिम आशियातील तेल सुविधा आणि जहाजांवरील हल्ल्यांमुळे तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास सहा आठवड्यांनंतर प्रथमच 100 डॉलरच्या पुढे गेल्या. ब्रेंट क्रूड वायदा 2.94 टक्क्यांनी वाढून 100.73 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.05 टक्क्यांनी वाढून 98.84 वर होता.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील जोखीम टाळण्याच्या वातावरणामुळे रुपयावर दबाव राहण्याची शक्यता आहे. अमेरिका-इराण तणाव वाढल्यास रुपयाची घसरण आणखी तीव्र होऊ शकते. मात्र, डॉलर काहीसा कमजोर झाल्याने रुपयाने सुरुवातीचे नुकसान काही प्रमाणात भरून काढले, असे मिराई असेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या पाच तेलवाहू जहाजांवर कारवाई केली. त्यानंतर इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या लक्ष्यांवर प्रतिहल्ला केला. या घडामोडींमुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 123.19 कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली.
तेलाच्या किमती वाढल्याचे तेल कंपन्यांना फटका –
पश्चिम आशियातील ताज्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्याने, सरकारी मालकीच्या इंधन विक्रेत्यांना पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 23 रुपये प्रति लिटरने तोटा होत आहे. जुलै महिन्यानंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. घरगुती एलपीजीवरील अंडर रिकव्हरी 200 रुपये प्रति सिलेंडर आहे.
ब्रेंट क्रूडच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ होऊन ती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचली, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडच्या किमतीत जवळपास 2 टक्क्यांनी वाढ होऊन ती सुमारे 95 डॉलरवर पोहोचली. भारतीय क्रूड बास्केट सुमारे 109 डॉलर प्रति बॅरलवर आहे.
जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक देश असलेल्या भारतावर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारांचा विशेष परिणाम होतो. पेट्रोल आणि डिझेलसारखी इंधने बनवण्यासाठी लागणार्या कच्च्या तेलाच्या (क्रूड) गरजेपैकी 88 टक्क्यांहून अधिक आयात केली जाते.
किमतींमध्ये सातत्याने होणार्या वाढीमुळे देशाचे डॉलरमधील आयात बिल वाढते आणि त्यामुळे व्यापार संतुलन व रुपयावर दबाव येऊ शकतो, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. तसेच, किरकोळ पंपावरील दर स्थिर राहिल्याने, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅसच्या विक्रीवर इंधन विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागतो. जर सध्याची भू-राजकीय परिस्थिती कायम राहिली, तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती इंधन, वाहतूक आणि इतर ऊर्जा-संबंधित खर्चांद्वारे देशांतर्गत महागाईलाही हातभार लावू शकतात.





