‘सीआरपीएफ’ची तुकडी लवकरच पुण्यात
पुणे – सलग दोन महिने बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्यभरात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांना (सीआरपीएफ) बंदोबस्तासाठी पाचारण करण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे. पुण्यातही “सीआरपीएफ’ची एक तुकडी बंदोबस्तात तैनात राहणार आहे.
“सीआरपीएफ’च्या एका तुकडीत 120 जवान आहेत. पुणे शहरातील 69 भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहेत. प्रतिबंधित भागासह शहराच्या वेगवेगळ्या भागांत सध्या पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सलग बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण आला आहे. प्रतिबंधित भागातील काही ठिकाणी “सीआरपीएफ’ची एक तुकडी तैनात करण्यात येणार असून ही तुकडी लवकरच पुण्यात दाखल होईल.
“सीआरपीएफ’चे जवान पोलिसांना साहाय्य करणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेतील पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली. राज्यात “सीआरपीएफ’च्या 20 तुकड्या बंदोबस्तासाठी देण्यात याव्यात. बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण आला आहे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. मुंबईसह राज्यातील अन्य शहरात बंदोबस्तासाठी सीआरपीएफच्या जवानांची सहाय्य घेण्यात येणार आहे.





