वाईत संचारबंदीतही पोहण्यासाठी गर्दी

वाई (प्रतिनिधी) – जगभर थैमान घालणारा करोना आता जिल्ह्यातही वाढू लागला आहे. त्यामुळे करोना थोपविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना वाई शहरातून जाणाऱ्या धोमच्या कालव्यांमध्ये पोहण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. दिवसभर या कालव्यांमध्ये पोहण्यासाठी होत असलेली गर्दी ही करोनाला निमंत्रण ठरु शकते. त्यामुळे अशा प्रकारे बेजाबाबदार वागणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.
करोनामुळे सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये असे वारंवार प्रशासन सांगत आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसादही दिला जात आहे. जिल्ह्यात संचारबंदी असल्याने दोनपेक्षा अनेक व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही वाई शहरातून वाहणाऱ्या धोम धरणाच्या कालव्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत अगदी तरुणांसह अबलावृद्धांचीही गर्दी होत आहे.
करोनामुळे पुण्या, मुंबईचे अनेक नागरिक आपल्या कुटुंबांसह वाईत आले आहेत. ते याठिकाणी कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत हे कोणास ठाऊक नाही. तसेच पुण्या, मुंबईवरुन आलेले अनेकजण या कालव्यांमध्ये पोहण्यासाठी येत आहेत.
दुर्दैवाने या एकत्रित पोहण्यातून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने वाई शहरातील नागरिक, तरुणांनी स्वत:हूनच कालव्यांमध्ये पोहणे बंद करणे गरजेचे आहे. दरम्यान, तसेच न झाल्यास पोलीस प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन करुन कालव्यात एकत्रित पोहणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.





