पुणे – रविवार म्हटल्यावर पुणेकरांचा खास बेत आलाच. लॉक डाऊन याला अपवाद नाही. सकाळपासून पुणेकरांनी शहरासह उपनगरात चिकन खरेदीसाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टनिंगचे पालन केले. तर अनेक ठिकाणी सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. शहरात करोनाचा संसर्ग वाढत असताना अशी गर्दी होणे गंभीर असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये पुण्यात चिकन विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून पुणेकरांनी चिकन खरेदीसाठी गर्दी केली. अनेक ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. किराणा दुकान, दुध विक्रेत्यांपेक्षा ही गर्दी अधिक होती. दुपारपर्यंत ही गर्दी होती. अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टनिंगचे पालन होत नसून, महापालिकेने सील केलेल्या भागांतही चिकन विक्री होत आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चिकन दुकाने उघडी ठेवण्याची गरज आहे का, इतर काही जिल्ह्यात चिकन विक्रीला बंदी आहे, तशी पुण्यात ही ठेवावी, अशी मागणी काही नागरिक करत आहेत.