चिंबळी : खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कुरूळी, चिंबळी, मोई आणि मरकळ परिसरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविक आणि महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यातील या शेवटच्या सोमवारी चिंबळी (ता. खेड) येथील महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. पहाटे अभिषेक विधी संपन्न झाला. यावेळी बेलपत्र आणि फुले अर्पण करण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविक आणि महिलांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विविध मान्यवरांच्या वतीने केळी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.