शाब्बास ; पोरंच्या खेळाने भारताला यश

प्रोव्हिडन्स (गयाना) – भारतीय संघाचा १९ वर्षांखालील कर्णधार यश धूळ आणि फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल यांच्या भरीव कामगिरीने भारतीय युवकांनी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतील पहिला अडथळा पार केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारताचाही डाव अडखळला होता. पण, मधल्या फळीत यश धूलचे अर्धशतक आणि शेख रशिद, निशांत सिंधू, कौशल तांबे यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताला २३२ धावांची मजल शक्य झाली होती. यश धूल आणि शेख रशिद यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेली ७१ धावांची भागीदारी भारताचा डाव सावरणारी ठरली. त्यानंतर यश आणि कौशल यांची सहा षटकातील ३६ धावांची भागीदारी भारताचे आव्हान भक्कम करणारी ठरली. यशने १० धावांत ६२ धावांची खेळी केली, तर कौशलने ४४ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. शेखने ३१ धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ४५.४ षटकांत १८७ धावांत आटोपला. डेवाल्ड ब्रेविस याची अर्धशतकी खेळी आणि कर्णधार जॉर्ज व्हॅन हेर्डन (३५) याचे योगदान वगळता त्यांचे फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. भारताच्या विकी ओस्तवालच्या फिरकीच्या जाळ्यात ते अडकले. ओस्तवाल आणि बावा यांनीच दक्षिण आफ्रिकेला गुंडाळले. ओस्तवालने ५, तर बावाने ४ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
भारत ४६.५ षटकांत सर्व बाद २३२ (यश धूल ८२(१००), कौशल तांबे ३५ (४४), मॅथ्यू बोस्ट ३-४०, डेवाल्ड ब्रेविस २-४३) वि.वि. दक्षिण आफ्रिका ४५.४ षटकांत सर्वबाद १८७ (डेवाल्ड ब्रेविस ६५ (९९), जॉर्ज व्हॅन हिर्डन ३६ (६१), ओस्तवाल ५-२८, राज बावा ४-४७)





