मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे. कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगनमताने शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा दावा करताना धस यांनी कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर थेट हल्ला चढवला. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधत, या घोटाळ्याची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सुरेश धस यांचे आरोप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत सांगितले की, विनय आवटे हे गेल्या २० वर्षांपासून (२००४ ते २०२५) कृषी आयुक्तालयात कार्यरत असून, त्यांनी खासगी विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचा विमा रोखला. “स्कायमेट यंत्रणेच्या माध्यमातून हप्ते घेतले जातात. विमा कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून व्याज कमावले, पण शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही,” असा गंभीर आरोप धस यांनी केला. सुरेश धस यांनी पुढे म्हटले की, “वनखात्याच्या, गायरान जमिनी आणि अगदी मंदिर-मशिदींच्या जमिनींवरही खोटे शेतकरी दाखवून पीक विमा भरला गेला. बीडच्या ११ तालुक्यांसह वर्धा, नागपूर, अमरावती आणि जालना येथेही तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी हे पैसे खाल्ले.” धस यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत, “एक रुपया पीक विमा योजना कोणाच्या काळात आली? कोण मंत्री होता, हे सर्वांना माहीत आहे,” असंही म्हटले आहे. विनय आवटे कोण? विनय आवटे हे कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी अधिकारी असून, गेल्या दोन दशकांपासून ते विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय आवटे यांनी मंजूर केल्याचा आरोप आहे. आवटे यांनी विमा कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभी केली आणि शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले. एक व्यक्ती २० वर्षे पीक विम्याचे वाटोळे कशी करू शकते? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी धस यांनी केली. तसेच, कापूस बंडी आणि नॅनो युरिया घोटाळ्याच्या तक्रारीनंतरही आवटे यांना चौकशी प्रमुख बनवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. “कृषी खातं जेलमधून चालवणारा आका कोण होता? एक रुपया पीक विमा योजना कोणत्या मंत्र्याच्या काळात आली? २०२१ नंतरच्या घोटाळ्यांचा तपास केला, तर सत्य समोर येईल,” असे धस म्हणाले. त्यांनी बीड, वर्धा, नागपूर, अमरावती आणि जालना येथील खोट्या पीक विमा प्रकरणांमध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या जवळच्या लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्येही धस यांनी मुंडे यांच्यावर ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.