पुणे जिल्हा | भीमा नदीकाठावरील पिके सडली

देऊळगावराजे, (वार्ताहर)- भीमा नदीला दोन ते तीन दिवसांपूर्वी मोठा पूर येऊन गेला आहे. दौंडवरून तब्बल दीड लाख क्यूसेक पाणी उजनी धरणात सोडले. तालुक्यातील आणि पूर्व भागातील नदीकाठच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, पुराने नदीकाठी असलेल्या कपाशी पिकात तब्बल ४० तास पाणी साचून राहिल्याने हे पीक सडून गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येणारी कपाशी देऊळगाव राजे परिसरात कपाशी हे नगदी पीक म्हणून केले जात आहे.
यंदा जूनमध्ये धरण मोकळे असल्याने आणि पाण्याची कमतरता कमी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे वळले आहेत. परंतु या पुराने नदीकाठी असलेल्या कपाशी पिकात तब्बल ४० तास पाणी साचून राहिल्याने हे पीक पूर्ण सडून गेले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. नवीन लागवड केलेली ऊस, चारा पिके, तरकारी या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आता पूर ओसरला असला तरी शासन स्तरावर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अजून तरी मदत मिळालेली नाही. देऊळगाव राजेच्या तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली तर त्यांनी अजून जीआर आला नाही, अशी तोंडी उत्तर देऊन शेतकऱ्यांना माघारी पाठवले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. पुरामुळे शासन स्तरावर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. आदेश आला की त्वरित योग्य माहिती पाठवली जाईल. दादासाहेब लोणकर -मंडल अधिकारी देऊळगाव राजे
पुरामुळे तळहाताप्रमाणे जपलेली पिके एका रात्रीत नष्ट झाली आहेत. कर्ज काढून खर्च केलेला पाण्यात गेला आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावर त्वरित पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई मिळावी. -सचिन आवचर, शेतकरी देऊळगावराजे.




