पुणे : पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अॅथलिट्सच्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलें आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची गाडी तिथे पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती, असं उत्तर ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे.
पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन टीकेची झोड उठली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेस ट्रॅकवर गाड्या पार्क करुन क्रीडा सुविधांचं नुकसान केलं आहे, असा आरोप पुण्यातील भाजप नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
नेमकं काय घडलं?
26 जूनला शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी शरद पवारांसह काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पार्क केल्यामुळे टीकेची झोड उठली होती.