मुंबई – वादग्रस्त विधाने करून अडचणीत आलेले माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निवडीवर बरळले आहेत. रवींद्र जडेजापेक्षा अक्सर पटेलला संघात स्थान द्या, अशी मागणी करत त्यांनी पुन्हा एकदा जडेजाला लक्ष्य केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी जडेजावर ताशेरे ओढले होते. त्यावेळी मी तूमच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे, असे टीकास्त्र जडेजाने मांजरेकरांवर सोडले होते. त्यानंतर सातत्याने वादग्रस्त विधाने केल्यानंतर बीसीसीआयने त्यांना यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील समालोचकांच्या पथकातून बाहेर काढले होते. त्यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे माफिनामाही सादर केला होता. मात्र, तरीही त्यांचा समावेश झाला नाही. आता ते विविध संकेतस्थळे तसेच काही सोशल मीडिया चॅटवर आपली मते व्यक्त करताना दिसत आहेत. यातच त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघातील जडेजाच्या निवडीवर टीका केली आहे. जडेजापेक्षा पटेलची उपयुक्तता जास्त असून त्याचीच निवड करायला हवी होती, असे मत मांडले असून त्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.