Bihar Election 2025 : राहुल गांधींच्या मताधिकार यात्रेवर बंदीचा डाव? बिहार निवडणुकीत रंगणार नवा संघर्ष?

Bihar Election 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर महागठबंधनची मताधिकार यात्रा 17 ऑगस्टपासून सासाराम येथून सुरू होणार आहे. मात्र, यात्रेच्या सुरुवातीपूर्वीच वाद निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने सभास्थळ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकारली आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या निर्णयामुळे संतापलेले राजद खासदार सुधाकर सिंह यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “महागठबंधनचा हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. हेलिकॉप्टर लँड होईल आणि सभा झाली नाही, तरी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव रोड मार्च नक्कीच करतील. प्रशासनाला मान्य असो वा नसो, आमचा कार्यक्रम होणारच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यात्रेचा भव्य स्वरूप आणि उद्देश –
ही मताधिकार यात्रा अत्यंत व्यापक असून, मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. ही यात्रा 23 जिल्ह्यांतून जाणार असून, सुमारे 50 विधानसभा मतदारसंघांना कव्हर करेल. शहाबाद, मगध, अंग, कोसी, सीमांचल, मिथिला, तिरहुत आणि सारण या प्रमुख भागांत सभा आणि रोड शो आयोजित केले जाणार आहेत. महागठबंधनमधील सर्व प्रमुख नेते या यात्रेत वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. तथापि, मध्येच तीन दिवसांचा ब्रेक ठेवण्यात आला आहे, जेणेकरून काही पक्षांना संघटनात्मक कामे करता येतील, तर इतर पक्ष यात्रा सुरू ठेवतील.
यात्रेच्या यशासाठी खास नियुक्त्या
यात्रेच्या यशासाठी महागठबंधनने विशेष तयारी केली आहे. काँग्रेसने 25 जिल्ह्यांमध्ये जिल्हा समन्वयक नियुक्त केले आहेत, जेणेकरून तयारीवर बारकाईने लक्ष ठेवता येईल आणि कोणतीही कमतरता राहणार नाही. या यात्रेचा मुख्य हेतू निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे आहे. महागठबंधनचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाने मतदार यादीत गडबड आणि मतचोरीला प्रोत्साहन दिले आहे. हाच मुद्दा घेऊन महागठबंधन जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे. राजद खासदार सुधाकर सिंह यांनी सांगितले की, ही केवळ यात्रा नसून, लोकशाही हक्कांच्या संरक्षणाचा हा लढा आहे.
राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीपूर्वी महागठबंधन या यात्रेद्वारे संपूर्ण बिहारमध्ये राजकीय वातावरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, महागठबंधनमध्ये जागावाटपाचा निर्णय अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, सूत्रांनुसार, काँग्रेसने आपल्या उमेदवारांची निवड अंतर्गत पातळीवर सुरू केली आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षण अहवालानुसार, यावेळी विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, असे संकेत आहेत.





