शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

आधीच करोना संकट, त्यात निसर्गही कोपला!
पवनानगर – वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. 14) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. या वादळी पावसामुळे बळीराजाची त्रेधातिरपीट उडाली. आणि आधीच करोना संकट त्यात निसर्गही कोपला अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
शुक्रवारी (दि. 15) सकाळपासून दुपारपर्यंत बहुतेक ठिकाणी विद्युत वाहक तारांवर झाडे पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होता. कडधे येथील फूल उत्पादक शेतकरी वाघु शकंर मोहोळ या शेतकऱ्याच्या पॉलीहाऊसचे कर्टन आणि टॉप उडून गेल्यामुळे तीन ते साडेतीन लाखांपर्यंत नुकसान झाले आहे.
गेल्या काही काळात करोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे गुलाब विक्रीही ठप्प झाली आहे. जरी विक्री होत नसली तरी गुलाब रोपांना दररोज खते, औषधे, फवारणी ही दररोज करावी लागत आहे. सध्या गुलाब बाजारात जात नसला तरी खर्च हा करावाचे लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखावी, अशी मागणी फूल उत्पादक शेतकरी करीत आहेत.
वादळी वाऱ्यासह गुरुवारी झालेल्या पावसामुळे पॉलीहाऊसचे कर्टन आणि टॉप उडून गेल्यामुळे तीन ते साडेतीन लाखांपर्यंत नुकसान झाले आहे.
– वाघु मोहोळ, फूल उत्पादक शेतकरी.





